आपल्यापैकी अनेकांनी 3 इडियट्स हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरु होतात. त्या दिवशी शहरात खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसते. यावेळी रँचो हा चित्रपटातील नायक हा डॉक्टर असलेल्या अभिनेत्रीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसूती करतो. असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडला. धावती लोकल ट्रेन, गर्भवती महिलेला अचानक सुरु झालेल्या प्रसूती वेदना आणि मदतीसाठी कोणी नसताना धाडसी तरुणाने दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस बाळ जन्माला आले आहे. मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात ही घटना घडली.
नेमंक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.
यावेळी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. तिचे बाळ अर्धे बाहेर, अर्धे आत अशा नाजूक स्थितीत अडकले होते. तसेच राम मंदिर या स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता. हा प्रसंग पाहून विकास बेद्रे यांनी जराही वेळ न घालवता तातडीने त्याची मैत्रिण असलेल्या डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला.
अन् मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला
डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.
या अत्यंत तणावपूर्ण क्षणी विकास बेद्रे यांनी अफाट धैर्य आणि समयसूचकता दाखवली. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लगाला. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे.
हिंमतीचे सर्वत्र प्रचंड कौतुक
दरम्यान विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेमुळे दोन जीव वाचले. या घटनेनंतर रिअल लाईफ हिरो असलेल्या विकास बेद्रे यांच्या हिंमतीचे सर्वत्र प्रचंड कौतुक होत आहे. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांना देव माणूस असेही बोलताना दिसत आहेत.


