चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून, आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा टप्पा पार पडला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण १७ प्रभागांमधील ६६ जागांसाठी आज भाजपाने मुलाखतींचे आयोजन केले होते. या प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आमदार चैनसुख संचेती प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबतच चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आणि भाजपाचे आजी-माजी जिल्हाध्यक्ष या मुलाखत प्रक्रियेत सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ६६ जागांसाठी तब्बल ६०० पेक्षा अधिक उमेदवारांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. प्रत्येक प्रभागातून अनेक तगड्या उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळे पक्षासमोर उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या साडेसात वर्षांपासून महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असल्याने, यावेळी ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पक्ष अत्यंत बारकाईने उमेदवारांची चाचपणी करत आहे. मात्र, इच्छुकांची वाढती संख्या पाहता 'बंडखोरी' रोखण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे.
आगामी काळात कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते आणि चंद्रपूरकर पुन्हा एकदा कुणाच्या हाती महापालिकेची चावी सोपवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

