पोंभूर्णा:- ग्रामपंचायत चकठाणा अंतर्गत दिनांक १० डिसेंबर रोजी शिपाई व पाणीपुरवठा सेवक पदे भरण्यासाठी लेखी परिक्षा घेण्यात आली. परंतू त्या परिक्षेलाच आता गालबोट लागले आहे. झालेल्या लेखी परीक्षेत तडजोड करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच, चार ग्रामपंचायत सदस्य,परिक्षणार्थी राजेंद्र गुरनुले व इतर परिक्षणार्थी सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. तडजोड झालेल्या या लेखी परिक्षेची प्रक्रियाच रद्द करून नव्याने परिक्षा घेण्याची मागणी निवेदकांनी केली आहे.
ग्रामपंचायत चकठाणा येथील शिपाई व पाणीपुरवठा सेवक भरतीचे परीपत्रक दिनांक २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले होते. सदर विषयाला घेऊन दिनांक १० डिसेंबर रोजी परिक्षा घेण्यात आली. परंतू ग्रामसेवक सचिन आदे यांनी आर्थिक लोभाला बळी पडून अगोदरच त्यांच्या ठरलेल्या परिक्षणार्थ्यांसाठी पेपर फोडल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ग्रामपंचायत चकठाणा येथे शिपाई म्हणून रोजंदारीवर काम करत असलेल्या साईनाथ जिवनदास वाकडे याला १०० पैकी ८० गुण व गजानन गणुजी तिवाडे याला १०० पैकी ९४ गुण पडले. मात्र सरपंच व प्रशासकीय अधिकारी म्हणून आलेले पंचायत विस्तार अधिकारी खोडके,परिक्षणार्थी व परिक्षार्थी यांच्या समक्ष प्रश्न पत्रिकेतील प्रश्न विचारले असता दोघेही उत्तर देण्यास असमर्थ ठरले. ज्या व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ कोण, या साध्या प्रश्नाचे उत्तर बरोबर देता आले नाही अशांना प्रत्येकी ८० व ९४ गुण कसे मिळाले असा उलटप्रश्न निवेदकांनी केला आहे.
झालेल्या लेखी परीक्षेचा पेपर काढण्याचे काम ग्रामसेवक सचिन आदे यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विचारात न घेता स्वमर्जीने केलेले आहे. त्यामुळेच निकालात गैरव्यवहार झाल्याचे उघडपणे दिसून येत आहे. अशा गैरप्रकाराने सुशिक्षित व्यक्तींवर अन्याय होत असून गावातील बेरोजगार व होतकरू युवकांना रोजगाराच्या संधीपासून मुकावे लागत आहे. यातून जुन्याच व्यक्तीला परत संधी देण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व परिक्षणार्थीने केला आहे. त्यामुळेच दोषींवर कायदेशीर कारवाई करून झालेली पदभरती रद्द करण्यात यावी, व नव्याने पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याची विनंती दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.
"परिक्षा नियमानुसार व पारदर्शक पध्दतीनेच घेण्यात आली. पेपर फुटीचा कोणताच प्रकार झालेला नाही. माझ्यावर आरोप करणे तथ्यहीन व चुकीचे आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याच उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही.
सचिन आदे,
ग्रामसेवक चकठाणा.

