आतले-बाहेरचे अडथळे पार करत गड जिंकला
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांनंतर राज्यभराचे लक्ष चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेकडे लागले होते. येथे निर्माण झालेला पेच हा केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर राजकीय रणनीती, अंतर्गत घडामोडी आणि निर्णायक नेतृत्वाची खरी कसोटी ठरणारा होता. या सत्तासमीकरणात प्रत्येक पाऊल महत्त्वाचे ठरत असताना, अनुभवी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका केंद्रस्थानी राहिली आणि त्यांच्या राजकीय कौशल्यानेच या संपूर्ण घडामोडींना दिशा मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. संख्याबळाने तुलनेने मजबूत असलेली काँग्रेस मात्र अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाच्या संघर्षामुळे दोन गटांत विभागली गेली. या विसंवादाचा अचूक अंदाज घेत भाजपने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. या प्रक्रियेत सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजनबद्ध आणि संयमी रणनीती अवलंबत आपले पत्ते उघड न करता आम्ही सत्ता स्थापनेच्या जवळ आहोत, महापौर भाजपाचा होईल असे संकेत वेळोवेळी माध्यमांना दिले.
सत्तास्थापनेची जुळवाजुळव सुरू असतानाच भाजपच्या अंतर्गत राजकारणाचाही एक टप्पा समोर आला. पक्षाने जाहीर केलेल्या महापौरपदाच्या उमेदवाराविरोधात आ.किशोर जोरगेवार वेगळाच डाव टाकत ॲड सारिका संदुरकर यांना पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पक्षातील शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला. अखेर पक्षश्रेष्ठींच्या स्पष्ट भूमिकेनंतर आणि भविष्यातील कारवाईची शक्यता लक्षात येताच संबंधित जोरगेवारांची भूमिका मवाळ झाली. त्यानंतर या घडामोडी आम्हीच घडवून आणल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हे सर्व राजकीय वर्तुळ आणि सर्वसामान्यांच्या नजरेपासून लपून राहिले नाही.
महापौरपदाच्या उमेदवार बदलावर थातूरमातूर उत्तरे देत वेळ काढण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापौर पद आणि गटनेतेपद दोन्ही गटांत विभागून देत पक्षाने तोडगा काढला. आ . किशोर जोरगेवार यांनी गटनेतेपद मिळाले आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे महापौर पद देण्यात आले.
या साऱ्या घडामोडीनंतर अंतिम टप्प्यात सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली निर्णायक भूमिका यशस्वी ठरली. स्पष्ट बहुमत नसतानाही योग्य वेळ साधत आणि राजकीय गणित अचूक जुळवत भाजपने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला. अखेर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी संगीता खांडेकर यांची निवड झाली आणि त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
या सत्तांतरामागील सूत्रधार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका निर्णायक ठरली. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा अचूक अंदाज घेत शेवटच्या क्षणी त्यांनी मोठी खेळी केली आणि चंद्रपूरच्या राजकारणात लक्षणीय उलटफेर घडवून आणला.
नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माझी निवड होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि मोठ्या जबाबदारीचा क्षण आहे. या यशामागे लोकनेते आणि विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि भक्कम पाठबळ आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कार्यपद्धतीमुळेच मला ही संधी मिळाली, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेची ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय चातुर्य, संयम आणि निर्णायक नेतृत्वाचे उदाहरण ठरली असून, या निवडणुकीत ‘एकच वार’ करून सत्ता मिळवण्यात मुनगंटीवार यशस्वी ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

