Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय भूकंप! वडेट्टीवार-धानोरकर वादात काँग्रेसचा घात

Bhairav Diwase
चंद्रपूर मनपाची सत्ता भाजपच्या हातात
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत आज सत्तेचा असा काही खेळ रंगला की संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. काँग्रेसचे दोन दिग्गज नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्षाचा फायदा अखेर भाजपने उचलला आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी बाजी मारली आहे.

चंद्रपूर महापालिकेवर पंजा की कमळ? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादाने पक्षाला सत्तेपासून दूर ढकलले. भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौर पद काबीज केले.

ही निवडणूक केवळ अटीतटीची नव्हती, तर ती गणितांची जुळवाजुळव करणारी ठरली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले, तर MIM चा एक नगरसेवक तटस्थ राहिला. यामुळे मॅजिक फिगर बदलली आणि भाजपने ठाकरे गटासोबत युती करून सत्ता हस्तगत केली.


महापौर निवडीनंतर खरा ड्रामा रंगला तो उपमहापौर पदासाठी. याठिकाणी भाजप-ठाकरे युतीचे प्रशांत दानव आणि काँग्रेस-जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्यात टाय झाला. दोघांनाही ३२-३२ मते मिळाली. अखेर लोकशाहीच्या या लढाईत 'ईश्वर चिठ्ठी'चा सहारा घेण्यात आला आणि नशिबाने प्रशांत दानव यांच्या पारड्यात कौल दिला.


चंद्रपुरातील या निकालाने काँग्रेसला मोठा धडा दिला आहे. अंतर्गत गटबाजी कशी सत्तेची संधी हिरावून घेऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. तर दुसरीकडे, सात वर्षांनंतर भाजप आणि ठाकरे गट चंद्रपुरात एकत्र आल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.