चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला १०० मीटर धावण्याच्या चाचणीचा वाद आता पूर्णपणे मिटला आहे. तांत्रिक आक्षेप आणि उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे आज उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ अंतर्गत, ११ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली होती. मात्र, १०० मीटर धावण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचा आणि गुण कमी मिळत असल्याचा दावा अनेक उमेदवारांनी केला होता. हे प्रकरण तापल्यानंतर पोलीस प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने पावले उचलली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि भरती मंडळाने पारदर्शकतेचा पुरावा देत, या चार दिवसांतील पात्र उमेदवारांची १०० मीटर चाचणी पुन्हा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये हीच विभागाची भूमिका आहे.
आज, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेपासून तुकूम येथील पोलीस मुख्यालय मैदानावर ही फेरचाचणी पार पडत आहे. ज्या उमेदवारांनी आधी तांत्रिक तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यांनी आज पुन्हा एकदा आपले कसब दाखवले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि सकारात्मक निर्णयामुळे भरती प्रक्रियेवरचा उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. तूर्तास, या निर्णयाने भरती प्रक्रियेतील पारदर्शकता अधोरेखित केली असून उमेदवारांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहेत.

