Chandrapur News: १५ वर्षांचा संघर्ष आणि टोकाचे पाऊल! चंद्रपूरच्या 'त्या' शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

Bhairav Diwase
चंद्रपूर:- राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या त्या पाचही शेतकऱ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांनी आज रुग्णालयात जाऊन या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.


माणिकगड सिमेंट प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा किंवा जमिनी परत मिळाव्यात, यासाठी कुसुंबी गावचे हे शेतकरी गेल्या १५ वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र, न्याय मिळत नसल्याने हताश होऊन काल लचु आत्राम, जयराम कुळमेथे यांच्यासह पाच शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षातच विष प्राशन केले होते.


या धक्कादायक घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली असून, तातडीने उपचार मिळाल्याने या शेतकऱ्यांचा जीव वाचला आहे. आज पालकमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि या प्रकरणात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.