चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड आणि तळोधी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तीन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या वाघामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट होते, मात्र वनविभागाच्या चोख नियोजनामुळे शनिवारी या वाघाला जेरबंद करण्यात आले.
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील हरिदास कुबडे, तसेच तळोधी वनपरिक्षेत्रातील आकापुर आणि सावर्ला येथील शेतकरी वासुदेव वेटे आणि प्रेमीला वाटगुरे या तिघांना या वाघाने ठार केले होते. या घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाघाला पकडण्याची मागणी लावून धरली होती.
शासनाकडून हिरवा कंदील मिळताच, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम आखण्यात आली. शनिवारी या मोहिमेने निर्णायक वळण घेतले. टीटीसी चंद्रपूरचे रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली, अनुभवी शूटर अजय मराठे यांनी वाघावर अचूक निशाणा साधत त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर सुरक्षितरीत्या या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहूजा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत तळोधी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी, 'स्वाब' संस्थेचे बचावदल प्रमुख जिवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर आणि मागोवा पथकाचे वनमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाघ जेरबंद झाल्यामुळे नागभीड आणि तळोधी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वनविभागाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


