Leopard dies in train collision: रेल्वे ठरतेय वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा; रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू!

Bhairav Diwase

राजुरा:- वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी ओळखले जाणारे चनाखा वनक्षेत्र आता प्राण्यांसाठी जणू 'डेथ ट्रॅप' बनत चालले आहे. बल्लारशाह–काझीपेठ या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.


ही घटना ११ एप्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहिरगाव उपवनक्षेत्रातील चनाखा नियतवनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक १६० मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे ट्रॅकवर हा अपघात झाला.


दीड वर्षांची एक मादी बिबट्या हा रेल्वे रूळ ओलांडत असताना भरधाव रेल्वेने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या बिबट्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा परिसर वन्यप्राण्यांच्या नियमित वावराचा मानला जातो. मात्र, या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही ठोस उपाय किंवा अंडरपास नसल्याने अशा अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.


रेल्वे प्रशासनाने आणि वनविभागाने या संवेदनशील क्षेत्रात रेल्वेचा वेग मर्यादित ठेवणे किंवा संरक्षक भिंती आणि कॉरिडॉर उभारणे गरजेचे झाले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर हा 'मृत्यूचा सापळा' अजून किती निष्पाप वन्यजीवांचा बळी घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.