Pombhurna News: चंद्रपूरच्या कडाक्याच्या उन्हात उमलली 'शेवंती'; पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्ह्याचे तापमान सध्या ४० अंशांच्यावर पार असून सूर्य जणू आग ओकत आहे. अशा परिस्थितीत शेती करणे जिथे कठीण झाले आहे, तिथे पोंभुर्णा तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र शेतात नंदनवन फुलवले आहे. कापूस आणि सोयाबीनच्या चक्रातून बाहेर पडत या शेतकऱ्याने फुलांच्या शेतीतून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे.


चंद्रपूर जिल्ह्याचा पोंभुर्णा तालुका तसा जंगलाने वेढलेला, पण याच तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकरी अर्जुन पत्रू मरस्कोल्हे यांनी आज सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अर्जुन इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस, सोयाबीन, गहू आणि मिरचीची पिके घेत होते. मात्र, मेहनत जास्त आणि हाती येणारा नफा कमी, यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.


खर्चाचा मेळ बसत नसल्याने त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. हार न मानता त्यांनी शेवंती आणि झेंडूच्या फुलांच्या शेतीकडे वळण्याचे धाडस केले. आज त्यांच्या शेतात लाल, पांढऱ्या व पिवळ्या-धमक शेवंतीचा सुगंध दरवळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चंद्रपूरच्या या भीषण उष्णतेतही योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि वेळोवेळी फवारणीच्या जोरावर त्यांनी हे पीक टिकवून ठेवले आहे.

आधी कापूस-सोयाबीनमध्ये खर्च निघणे कठीण व्हायचे. पण आता फुलांच्या शेतीमुळे रोजचा नफा मिळत आहे. दररोज फुलांची तोडणी होते आणि पोंभुर्णा, गोंडपिपरी तसेच मूल येथील बाजारपेठेत ही फुले विकली जातात. कृषी विभागाने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले असून त्यांच्यामुळेच मला मराठवाड्यातील शेती पाहण्याची संधी मिळाली. असे शेतकरी अर्जुन मरस्कोल्हे यांनी म्हटले.


अर्जुन यांच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची आणि मुलाची खंबीर साथ लाभली आहे. केवळ एक शेतकरी म्हणून नव्हे, तर संपूर्ण कुटुंब मिळून या फुलांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन पाहत आहे. अर्जुन यांनी आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे.


संकटाच्या काळात रडत न बसता, पीक पद्धतीत बदल केला तर शेती आजही नफ्याची ठरू शकते, हेच अर्जुन यांनी सिद्ध करून दाखवले आहे.