Tiger Attack: वाघ आला... शेळीला तोंडात धरून पसार झाला!

Bhairav Diwase
नागभीड:- नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावात मध्यरात्री वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाघाने चक्क शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून ४ शेळ्यांना ठार केले असून, वाघ शेळीला तोंडात धरून बिनधास्तपणे रस्त्याने जात असल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा संपूर्ण गाव साखरझोपेत होते, तेव्हा एका वाघाने गावात शिरकाव केला. या वाघाने तीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून हल्ला चढवला. या हल्ल्यात एकूण ४ शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत.


विशेष म्हणजे, हा सर्व थरार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, वाघ एका शेळीला आपल्या जबड्यात धरून शांतपणे रस्त्यावरून जात आहे. सकाळी जेव्हा शेतकऱ्यांनी गोठ्यात पाहिले, तेव्हा शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या आणि एक शेळी बेपत्ता होती.


या घटनेची माहिती मिळताच वनविभागाला पाचारण करण्यात आले. मात्र, थेट गावात शिरून वाघाने केलेल्या या हल्ल्यामुळे गोविंदपूर परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. शाळेच्या परिसरातूनच वाघ गेल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. आता वनविभाग या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.