Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर मनपाच्या नालेसफाईवरून भाजप नगरसेवक संतापले; स्वतः हाती घेतले पावडे!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना (उबाठा) ची सत्ता आहे, पण म्हणतात ना 'दिव्याखाली अंधार', तशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. आपल्याच सत्ताधारी मनपा प्रशासनाविरोधात आता भाजपचे नगरसेवकच रस्त्यावर उतरले आहेत. बंगाली कॅम्प परिसरातील नालेसफाईसाठी मजूर मिळत नसल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी चक्क स्वतः नाल्यात उतरून सफाई सुरू केली आहे. इतकेच नाही तर, तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास नाल्यातील घाण थेट मनपा कार्यालयात फेकण्याचा इशाराही नगरसेवक रॉबिन बिस्वास दिला आहे.


चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या राजकीय गटबाजीचा फटका थेट जनसामान्यांच्या कामांना बसताना दिसतोय. मनपावर भाजपची सत्ता असली आणि महापौर आमदार सुधीर मुनगंटीवार गटाचे असले, तरी बहुतांश नगरसेवक मात्र आमदार जोरगेवार गटाचे आहेत. या दोन्ही गटांमधील अंतर्गत संघर्षाचा अंक आता बंगाली कॅम्प प्रभागातील नालेसफाईच्या मुद्द्यावरून चव्हाट्यावर आला आहे.


बंगाली कॅम्प हा अत्यंत मोठा आणि क्लिष्ट प्रभाग आहे. मात्र, इतक्या मोठ्या भागाच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून केवळ दोनच मजूर दिले जात आहेत. नाल्या तुंबल्याने नागरिकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. वारंवार मागणी करूनही मजूर मिळत नसल्याने अखेर भाजप नगरसेवक रॉबिन बिस्वास यांनी हाती पावडे घेतले आणि नालेसफाईला सुरुवात केली.


यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. जर पुढील तीन दिवसांत बंगाली कॅम्प परिसरातील नालेसफाईसाठी अतिरिक्त मजूर उपलब्ध करून दिले नाहीत, तर नाल्यांमधील सर्व घाण आणि कचरा गोळा करून तो थेट महानगरपालिका कार्यालयात नेऊन टाकू.


एकीकडे स्वच्छतेच्या गप्पा मारणारी मनपा, स्वतःच्याच नगरसेवकांना पुरेसे मनुष्यबळ देऊ शकत नसल्याने आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता हा 'कचरा वाद' येणाऱ्या काळात काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.