Chandrapur News: चंद्रपुरात प्रसिद्ध 'रसराज' ब्रेडला मुदत संपण्यापूर्वीच बुरशी

Bhairav Diwase
ग्राहकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!
चंद्रपूर:- शहरातील प्रसिद्ध आणि नामांकित 'रसराज' कंपनीच्या ब्रेडबाबत एका ग्राहकाने खळबळजनक दावा केला आहे. ब्रेडची मुदत (Expiry Date) संपण्यासाठी अजून एक दिवस शिल्लक असतानाच, पाकीट उघडताच संपूर्ण ब्रेडला बुरशी लागल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


होय, हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नेहमीप्रमाणे एका ग्राहकाने विश्वासाने बाजारपेठेतून 'रसराज' कंपनीचा ब्रेड खरेदी केला. ब्रेडच्या पाकिटावर असलेली एक्सपायरी डेट तपासली, तर मुदत संपायला अजून एक दिवस शिल्लक होता. मात्र, जेव्हा ग्राहकाने घरी जाऊन हे पाकीट उघडले, तेव्हा आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. ब्रेडच्या स्लाईसवर मोठ्या प्रमाणात बुरशी (Fungus) साचलेली होती.


अनेकदा लहान मुले किंवा नागरिक घाईघाईत न पाहता अशा ब्रेडचे सेवन करतात. जर हा बुरशीयुक्त ब्रेड खाल्ला गेला असता, तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असता, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. ग्राहकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला.


एकीकडे रसराज सारख्या नामांकित ब्रँडवर विश्वास ठेवून ग्राहक वस्तू खरेदी करतात, मात्र अशा प्रकारांमुळे या कंपन्यांच्या उत्पादन पद्धती आणि पॅकेजिंगच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन (FDA) काय कारवाई करणार? या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची चौकशी केली जाणार का? असे अनेक प्रश्न चंद्रपूरकर विचारत आहेत. तसेच संबंधित दोषी कंपनीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिकांमधून जोर धरत आहे.