चंद्रपूर मनपातील काँग्रेसच्या गटनेतेपदाची धुरा कोणाकडे? आज होणार फैसला!
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या अंतर्गत वादाला आता मोठं वळण मिळालं असून, गटनेतेपदाच्या वादावर आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात अंतिम सुनावणी होत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
खासदार प्रतिभा धानोरकर गटाने विद्यमान गटनेते राजेश अड्डूर यांना पदावरून हटवून, सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी धानोरकर गटातील १६ नगरसेवकांची बाजू विभागीय आयुक्तांनी ऐकून घेतली होती. त्यानंतर वडेट्टीवार गटाला आपली बाजू मांडण्यासाठी आज, सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
आज वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अड्डूर आणि त्यांचे समर्थक नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर आपली बाजू मांडणार आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे पूर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्त गटनेतेपदाबाबत आपला अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर काँग्रेसमधील या अंतर्गत धुसफुशीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वडेट्टीवारांचे समर्थक आपले पद टिकवून ठेवतात की धानोरकर गट बाजी मारतो, याकडे आता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

