Python snake: चंद्रपुरात आढळला १२ फुटांचा अजगर; नागरिकांमध्ये उडाली खळबळ!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरात तब्बल १२ फूट लांबीचा आणि २५ किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंदिरानगर परिसरातील फुकट नगर येथे हा प्रकार समोर आला. सुदैवाने सर्पमित्राच्या तत्परतेमुळे अजगराला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरातील फुकट नगर येथे तौसिफ शेख यांच्या घराजवळ अचानक महाकाय अजगर आढळून आला. हा अजगर तब्बल १२ फूट लांबीचा आणि जवळपास २५ किलो वजनाचा असल्याने घरातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र विशाल हिंगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या दक्षतेने आणि कौशल्याने त्यांनी या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर या अजगराला चंद्रपूर शहरालगतच्या जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.