आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती करून DMC सेंटर पूर्ववत चालू करण्याची गावातील नागरिक तसेच पाथरी तालुका संघर्ष कृती समितीनी केली मागणी.
Bhairav Diwase. June 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क पाथरी ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम सावली
सावली:- देशपातळीवर क्षयरोगाचे (TB) उच्चटन करण्यासाठी केंद्र सरकार 1962 पासून RTNCP (सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम) रावबीत आहे . ही संस्था जगातील सर्वात मोठी संस्था असून देशात पाच स्तरावर कार्यरत आहे. त्यात 1) राष्ट्रीय 2) राज्य 3) जिल्हा 4) तालुका 5) ग्रामीण स्तरावर अशी या संस्थेची कार्यकारी रचना असून महाराष्ट्रात या संस्थेची सुरुवात सण 1998-1999 मध्ये झाली . या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट क्षयरोग नियंत्रणाखाली आणणे, आणि देश क्षयरोग मुक्त बनविणे, आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी साधारणतः एका प्राथमिक आरोग्य केंद्राला DMC (डिस्टंट मायक्रोस्कोपी सेंटर) क्षयरोग तपासणी सूक्ष्मदर्शक यंत्र केंद्र कार्यान्वित आहे. त्या अनुषंगाने सावली तालुक्यातील एकमेव पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात DMC क्षयरोग तपासणी सूक्ष्मदर्शक यंत्र केंद्र आहे . कारण सावली तालुक्यापासून दूरवरच्या भागात तात्काळ पोहचणे आणि सेवा देणे शक्य नसल्यामुळे पाथरी हे अशा आतील आणि दुर्गम भागांसाठी जवळचे असून तपासणी आणि निदानास सोयीस्कर असून परिसरातील गावांना वरदान आहे. या केंद्रात RTNCP सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मधून एक लॅब टेक्निशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक लॅब टेक्निशियन असणे अपेक्षित आहे. पाथरी हे परिसरातील मोठी बाजारपेठ असून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी 20 ते 25 गावातील जनतेचा रोजच संपर्क येत असतो . पाथरी येथे शैक्षणिक सुविधेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल, अमरदीप इंग्लिश मिडीयम स्कुल, व संत तुकाराम कला कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय कृत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच जयकिसान बिगर शेती ग्रामीण बँक असून आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुद्धा परिसरातील जनता रोज ये - जा करतात. या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, फॉरेस्ट ऑफिस, जिल्ह्याचे मुख्य रेशीम कार्यालय तसेच सेतू सुविधा केंद्र सुद्धा आहे. शासकीय कामकाजाची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी परिसरातील जनतेचा फार मोठ्या संख्येने या ना त्या कारणास्तव दररोज संपर्क येत असून येथील ओपीडी 150 ते 200 आहे . त्यातल्यात्यात कोरोना महामारी चे संकट डोक्यावर असून पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. अशात रुग्णांना छोटेमोठे तसेच दुर्लभ आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. परंतु संपूर्ण परिस्थिती बघता पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वास्तविक चित्र काही वेगळेच आहे. येथील दोन्ही लॅब टेक्निशियन च्या जागा रिक्त असून पाथरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील DMC सेंटर शासकीय कागदोपत्री कार्यान्वित असून प्रत्यक्षात मात्र धूळ खात आहे . त्यामुळे अपेक्षित होणाऱ्या परिसरातील क्षयरोगग्रस्त रुग्णाच्या थुंकीची चाचणी तसेच साधारण आजारातील रक्ताची चाचणी होत नसल्याची माहिती समोर येऊन नागरिकांच्या आरोग्याची दुरावस्था होत असून गावातील स्थानिक प्रशासन गाढ झोपेत गेले आहे . या परिस्तितीला जबाबदार कोण? प्रशासन, आरोग्य विभाग की स्थानिक प्रशासन असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर निर्माण होत असून तात्काळ आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती करून DMC सेंटर पूर्ववत चालू करण्याची मागणी गावातील नागरिक तसेच पाथरी तालुका संघर्ष कृती समिती करीत आहे.