
चंद्रपूर:- गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना विशेष पथकातील असामान्य धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवणाऱ्या जवानांमध्ये पोलिस शिपाई अंकुश खंडाळे यांचे नाव उजळून निघाले आहे.
भद्रावती (चंद्रपूर) येथील या मनमिळाऊ आणि जबाबदार जवानाने सन २०१० मध्ये गडचिरोली पोलीस दलात प्रवेश करून भामरागड येथील नक्षलविरोधी विशेष पथकात काम करत अनेक वेळा धाडसाचे उदाहरण दाखवले आहे.
अंकुश खंडाळे यांनी नक्षलवाद्यांविरुद्धच्या या अत्यंत कठीण आणि धोकादायक मोहिमांमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. विशेषत: सन २०१८ मध्ये मौजा कोपरची जंगल परिसरातील नक्षलविरोधी कारवाईत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. या कारवाईत त्यांनी नक्षलवाद्यांना जोरदार नुकसान पोहचवले आणि सुरक्षितता सुनिश्चित केली.
त्याच वर्षी दोन नक्षलवाद्यांच्या सरंडर प्रक्रियेतही अंकुश खंडाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला ज्यामुळे त्या भागातील तणावपूर्ण वातावरण सुधारण्यात मदत झाली.
२०१९ मध्ये मौजा पोयरकोठी जंगलात जवळपास १०० ते १५० नक्षलवाद्यांविरुद्ध झालेल्या भयंकर चकमकीत दुर्दैवाने दोन जवान शहीद झाले; पण या कठीण प्रसंगी, धैर्य आणि पराक्रमाने त्यांनी नक्षलवाद्यांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गडचिरोली-चंद्रपूर परिसरातील सुरक्षात्मक वातावरणात उल्लेखनीय सुधारणा झाली असून या भागात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यास मोठे योगदान झाले आहे.
याशिवाय, अंकुश खंडाळे यांना २६ जून २०२५ रोजी मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले. याशिवाय, त्यांना २०२३ मध्ये पोलिस महासंचालकांकडून पोलिस महासंचालक पदक, विशेष सेवा पदक आणि खडतर सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवांमुळे त्यांचे शौर्य आणि त्याग अधिक प्रसिध्द झाले असून त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर परिसरातील पोलीस दलाचा आत्मविश्वास व सामर्थ्य अधिक दृढ केले आहे.
गडचिरोली-चंद्रपूर नक्षलविरोधी मोहिमांमध्ये धाडसाचे नवे क्षितिज गाठणाऱ्या अंकुश खंडाळे यांचे शौर्यप्रदर्शन नक्कीच इतर जवानांसाठी प्रेरणादायक ठरेल आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे.
आधार न्युज नेटवर्क/जितेंद्र माहूरे, भद्रावती