मातृवंदना योजनेचा आधार जिल्ह्यात 18 कोटी 28 लाख 22 हजार रुपयांचा दिला लाभ.

Bhairav Diwase

गरोदर मातांना मातृवंदना योजनेचा आधार.

जिल्ह्यात 18 कोटी 28 लाख 22 हजार रुपयांचा दिला लाभ.

कोरोना काळात 6 हजार 569 महिलांच्या खात्यावर 6 कोटी 27 लाख रुपये जमा.
Bhairav Diwase. Oct 23, 2020

चंद्रपुर:- प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत जिल्ह्यात मागील पावणे चार वर्षाच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील 43 हजार 104 लाभार्थ्यांच्या खात्यात 18 कोटी 28 लाख 22 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत 6 हजार 569 गरोदर मातांना 6 कोटी 27 लाख 11 हजार रुपयांचा आधार लाभला आहे.

गरोदर माता व शिशु सुदृढ आणि निरोगी राहावे तसेच गरोदर मातांना सकस आहार घेता यावा याकरिता शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातेस पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत तीन टप्यामध्ये सर्व स्तरावर पाच हजार रुपयांची रक्कम दिली जाते. योजनेची रक्कम संगणक प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येते.

गरोदर मातांना स्वतःच्या व शिशुच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे असते तसेच या कालावधीत मोलमजुरी रोजगारही बुडत असतो. या महिलांना सकस आहार, अंशता बुडीत मजुरी मिळावी या उद्देशानी शासनाच्या वतीने 2017 या वर्षापासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली.

जिल्ह्यातील उर्वरीत लाभार्थ्यांचे उदिष्ट पूर्ण करण्याकरिता तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी तसेच तालुका समुह संघटक, आशा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा व माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी दिली आहे.

गरोदर मातेस या योजनेचा लाभ घेण्याकरिता मातेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, गरोदर मातेचे आधार संलग्न बँक पोस्ट खाते व माता बाल संगोपन कार्डाची सत्यप्रत अनिवार्य आहे. गरोदर मातांनी योजनेच्या लाभाकरिता जवळच्या आरोग्य संस्था, ए.एन.एम, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे कंसात दर्शविली आहे:-

  1. वरोरा (3 हजार 170)
  2. चिमूर (3 हजार 165)
  3. नागभिड (3 हजार 003)
  4. ब्रह्मपुरी (3 हजार 436)
  5.  सावली (2 हजार 302)
  6. सिंदेवाही (2 हजार 639)
  7. भद्रावती (2 हजार 911)
  8. चंद्रपूर (3 हजार 72)
  9. मुल (2 हजार 365)
  10. पोंभूर्णा (1 हजार 235)
  11. बल्लारपूर (2 हजार 321)
  12. कोरपना (2 हजार 249)
  13. राजुरा (2 हजार 668)
  14. जिवती ( 1 हजार 141)
  15. गोंडपिपरी (1 हजार 521)

      तसेच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 906 असे एकूण 43 हजार 104 पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेतला आहे.