आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात 4 कोटी रू. किंमतीचे खुले नाटयगृह साकारणार.

Bhairav Diwase
पोंभुर्णा परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीसाठी उपलब्‍ध होणार हक्‍काचे व्‍यासपीठ.
Bhairav Diwase. Oct 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात 4 कोटी रू. किंमतीच्‍या खुल्‍या नाटयगृहाचे बांधकाम मंजूर झाले असून या नाटयगृहाच्‍या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. सदर नाटयगृह बांधकामाचा कार्यारंभ आदेश सुध्‍दा निर्गमित झाला आहे. या खुल्‍या नाटयगृहाच्‍या माध्‍यमातुन पोंभुर्णा परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीसाठी हक्‍काचे व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार आहे.
 
अर्थमंत्री म्‍हणून सन 2015-16 या वर्षाचा अर्थसंकल्‍प मांडताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍याचा समृध्‍द सांस्‍कृतीक वारसा पुढे चालविण्‍याच्‍या दृष्‍टीने नवोदित कलाकारांना पुरेसा वाव मिळावा यासाठी जिल्‍हास्‍तरावर सुसज्‍ज नाटयगृहे बांधण्‍याचा संकल्‍प जाहीर केला होता. चंद्रपूर शहरातील अत्‍याधुनिक, वातानुकुलीत प्रियदर्शिनी नाटयगृहापाठोपाठ बल्‍लारपूर शहरात अद्ययावत नाटयगृह आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने साकारले आहे. मुल शहरात 8 कोटी रू. निधी खर्चुन माजी मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार यांच्‍या स्‍मारकासह नाटयगृहाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. आता पोंभुर्णा शहरात 4 कोटी रू. निधी खर्चुन खुले नाटयगृह बांधण्‍यात येणार आहे. अर्थमंत्री म्‍हणून महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत असलेल्‍या श्री विठ्ठलाच्‍या पंढरपूरात नाम संकीर्तन सभागृहाच्‍या बांधकामासाठी 42 कोटी रू. निधी त्‍यांनी मंजूर केला. या नाम संकीर्तन सभागृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 च्‍या माध्‍यमातुन लवकरच पोंभुर्णा येथील खुल्‍या नाटयगृहाच्‍या बांधकामाला  सुरूवात होणार आहे. एकेकाळी दुर्लक्षीत समजले जाणारे पोंभुर्णा शहर व तालुका आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विकासाच्‍या झंझावाताच्‍या माध्‍यमातुन विकास प्रक्रियेत अग्रेसर ठरले आहे. पोंभुर्णा शहरात अमेरीकेतील व्‍हाईट हाऊससारखी दिसणारी नगर पंचायतीची अत्‍याधुनिक इमारत, बांबु हॅन्‍डीक्रॉफट अॅन्‍ड आर्ट युनिट, टूथपीक उत्‍पादक केंद्र, अगरबत्‍ती प्रकल्‍प, पंचायत समिती व तहसिल कार्यालयाच्‍या नविन इमारतीचे बांधकाम, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, ग्रामीण रूग्‍णालय, आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम, स्‍टेडियमचे बांधकाम, पाणी स्‍वच्‍छता पार्क आदी विकासकामे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातुन मंजूर झाली असून बहुतांश कामे पूर्णत्‍वास आली आहेत. पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात सुध्‍दा मोठया प्रमाणावर विकासकामे करण्‍यात आली आहेत.
 
पोंभुर्णा शहरात बांधण्‍यात येणा-या खुल्‍या नाटयगृहाच्‍या माध्‍यमातुन या परिसरातील नागरिकांना मोठे सांस्‍कृतीक व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार असून परिसरातील कलावंतांच्‍या कलाविष्‍काराला योग्‍य दालन उपलब्‍ध होणार आहे. प्रामुख्‍याने झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके या भागात बघण्‍यासाठी हक्‍काचे व्‍यासपीठ या खुल्‍या नाटयगृहाच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध होणार आहे.