गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत सुरू कामे मुदतीत पूर्ण करा:- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Bhairav Diwase

गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा घेतला आढावा.
Bhairav Diwase. Oct 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी, नागभिड, मुल व सावली या चार तालुक्यात सुरू असलेली सर्व कामे मुदतीत पूर्ण करून शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सिंचनाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

ब्रह्मपुरी येथे गोसीखुर्द विश्रामगृहात गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणालीच्या कामांचा आढावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतला.

चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण अनेक वर्षांपासून शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दाखवतो आहोत. त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वितरण प्रणाली अंतर्गत कालवे आणि बंद नलिकेची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी कामासंदर्भात येणाऱ्या विविध अडचणी विषयीची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. अधिकारी, कंत्राटदार तसेच लाभ क्षेत्रातील लाभधारक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावून कामे पूर्ण करावी. कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे.तसेच ही कामे करीत असताना अडचणी येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात.

यावेळी, ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता श्री.सातपुते, मुल व सावलीचे कार्यकारी अभियंता श्री.सोनवणे, नागभिडचे कार्यकारी अभियंता श्री.फाळके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.