अहमदनगर:- केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन,' असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
याशिवाय बिहार निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीविषयी बच्चू कडू यांनी भाष्य केलं. 'बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. राज्यातही काँग्रेसने कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसची राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतलेली नाही अथवा त्यास पाठिंबादेखील दर्शवलेला नाही.