चंद्रपुर:- ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी ओबीसी जनगणना समन्वय समितीतर्फे येत्या 26 नोव्हेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यांत आहे. मोर्चात जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना नागरिक, पोलिस प्रशासन, विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओबीसी जनगणना समन्वय समितीने केले आहे.
दीक्षाभूमी परिसरात विशाल मोर्चा निघेल. मोर्चात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती कोविड नियमांचे पालन करणार आहे. मास्क, सामाजिक अंतर राखून चालेल. मोर्चाच्या मार्गावर मोर्चेकऱ्यांनी शिस्तीने रांगेत चालावे, यासाठी पाचशेहून अधिक स्वयंसेवकांची चमू राहणार आहे.
मोर्चात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती शिस्तबद्ध स्वयंसेवक समजून पोलिस प्रशासनाला सहकार्य करेल.मोर्चा दीक्षाभूमीमार्गे रामनगर चौक, जटपुरागेटमार्गे, जयंत टॉकीज चौक, गांधी चौक, सराफालाईनमार्गे, कस्तुरबा रोज, जटपुरागेट, प्रियदर्शिनी चौकामार्गे चांदा क्लब ग्राउंडवर येईल. येथे जाहीर सभा होईल. मोर्चा आयोजनातील ओबीसी जनगणना समन्वय समितीतील पंधरा कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविले जाईल. सभास्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोर्चा आयोजन समिती, चंद्रपूर मनपा, यंग चांदा ब्रिगेडद्वारे करण्यात आली आहे. सभा परिसरात चंद्रपूर मनपाद्वारे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, मोबाईल स्वच्छतागृह ठरवून दिलेल्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
मोर्चासाठी येणाऱ्या ओबीसींनी मास्क घालून यावे. हा मोर्चाच्या आयोजनाकरिता समितीचे संयोजक बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, ऍड. दत्ता हजारे, प्रा. विजय बदखल, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. गुरनुले, डॉ. अभिलाषा गावतुरे, ऍड. सोनुले, प्रा. अनिल डहाके, सतीश मालेकर, डॉ. राजू ताटेवार, अविनाश आंबेकर, योगेश आपटे, बंडू हजारे सहकार्य करीत आहे.
वाहन पार्किंग व्यवस्था:-
मूल, दुर्गापूर मार्गोने येणाऱ्या वाहनांसाठी लॉ कॉलेजसमोर, विद्याविहार कॉन्व्हेंटमागील मैदान,
बल्लारपूर बायपासमार्गे येणारी वाहनांची याच ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
बल्लारपूर रोड महाकाली मंदिरमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कोहिनूर ग्राउंड, महाकाली मंदिर परिसरातील मनपा मैदान, रामराव चहारे यांच्या वाडीतील खुली जागा.
पठाणपुरामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कोहिनूर ग्राउंड, नागपूर रोज मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी विद्यानिकेतन शाळा, गौरव लॉन, लोकमान्य टिळक विद्यालय, सेट मायकल स्कूल मैदान, चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गांधी गॉर्डन स्कूल, सिंधी कॉलनी दांडिया मैदान, पीक प्लॅनेट बाजूच्या मैदान वाहने ठेवता येईल.