जळगावात एसटी कंडक्टरने घेतला गळफास.
जळगाव:- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आणखी एका एसटी महामंडळाच्या कंडक्टर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 'माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने जीवन यात्रा संपवली आहे.
कोरोनाच्या काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली आहे.
'एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना)
माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा'
असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.
मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने एसटी वाहक-चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या परिस्थितीतून मनोज चौधरी याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
एसटी मंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज चौधरी कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे.