विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्त विना शुद्र खचले
असा संदेश देत शिक्षणाचे महत्व जनमानसात रूजविणारे, अस्पृश्यता निवारण, महिला मुक्ती, विधवा विवाह अशा विविध माध्यमातुन समाजसुधारणेचे व्रत घेतलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारत सरकारकडे केली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे या मागणीचे पत्र आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांना पाठविले आहे. या मागणी संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी या आधीही केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व जनमानसात रूजविण्यासाठी तसेच अस्पृश्यता निवारण व समाजातील वाईट चालीरिती संपुष्टात आणण्यासाठी आजन्म परिश्रम घेतले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी 1848 मध्ये पुण्यात शाळा सुरू केली. या कार्यात त्यांची पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खंबीर साथ दिली. या दाम्प्त्यांने महिलांना शिक्षीत करण्यासाठी तसेच उपेक्षित वंचितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही. या दाम्पत्याचे जीवन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतवर्षासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करत त्यांना आदरांजली प्रदान करावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.