पोंभूर्णा नगर पंचायत निवडणूक.
शिवसेनेची उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू.
पोंभूर्णा नगर पंचायतची दुसरी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिण्यातच होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाची योग्य उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू झाली असुन शिवसेना ही त्यात मागे नसल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने १३ जागा लढवल्या होत्या, परंतु काहीच पदरात पडले नव्हते. शिवसेनेला साधे आपले खाते ही उघडता आले नव्हते. कारणमीमांसा जाणून घेतल्यावर वरिष्ठ पातळीवरून पाहिजे तसे सहकार्य किंवा योगदान मिळाले नसल्याचे कारण समोर आले. यावेळेस १७ ही जागेवर उमेदवार उभे करून ही निवडणूक पूर्ण तयारी व ताकदीनिशी लढविल्या जाणार असल्याची वाच्यता स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी केली असुन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुध्दा त्याला दुजोरा दिला आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूकीत स्पष्ट बहुमत घेऊन भाजपा ने सत्ता उपभोगली. नगर पंचायत मधील भाजप सत्तेच्या ४ वर्षापर्यंत विद्यमान आमदार सुधिर मुनगंटीवार राज्यात वित्त व नियोजन मंत्री होते. मुनगंटीवारांच्या विकासाचा झंझावात पोंभूर्णाकरांनी याची देही, याची डोळा अनुभवला असल्याने भाजपा कडे आज ईच्छूक उमेदवारांची मोठ्ठी रांग आहे. अ निवडून येण्याचा निकष लावून योग्य उमेदवार निवडीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्याचा कस लागणार आहे. काही प्रभागातील आरक्षण बदलल्याने जुन्या उमेदवारांना सोयीस्कर प्रभाग शोधतांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार ही परिस्थिती कशाप्रकारे हाताळतात त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. मतभेद प्रत्येकच पक्षात असतात, तसे हल्के फुल्के मतभेद पोंभूर्णा भाजपातही आहेत. परंतु आमदार सुधिर मुनगंटीवारांचे 'मजबूत छत्र' स्थानिक भाजपातील मतभेदांना डोके वर काढू देत नाही. मुनगंटीवारांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याने तालुकाअध्यक्ष गजानन गोरंटीवारांच्या 'डोकेदुखी' वरील हा 'रामबाण' उपाय आहे. त्यामुळे यामधील विसंतुष्ठता वाढून प्रकरण हाताबाहेर जाण्याची सुतराम शक्यता नाही.
दोन-तिन आठवड्यापूर्वी पोंभूर्णा काॅंग्रेस मधील आजी-माजी अध्यक्षांचा वाद उफाळून आला होता. दोघांमधील 'वार-प्रतिवार'च्या फैरी नंतर वरकरणी हा डोंब विझल्याचे दिसत असले तरी, मदभेदांची आतील आग अजूनही धुमसत असल्याचे दिसून येते. या दोघात समेट घडवून आणून हे प्रकरण शांत केल्या गेले नाही, तर येत्या निवडणुकीत काॅंग्रेसला याची मोठ्ठी किंमत मोजावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे काॅंग्रेस मधील अंतर्गत वाटाघाटीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असुन परिणामाची परिक्षा पोंभूर्णाकरांना येत्या काही दिवसातच उघडपणे पाहायला मिळणार आहे. योग्य उमेदवाराची कमी काॅंग्रेसकडेही नाही, पन 'कोणता झेंडा घेऊ हाती' या द्विधा मनःस्थितीत बरेच जण आहेत. तालुका काॅंग्रेसमधील या अंतर्गत बंडावर कायमचा पडदा पडण्याचे दिवस खुप मागे पडल्याचे एकंदरीत दोघांच्याही हालचालीवरून लक्षात येते. नगर पंचायत निवडणूकीवर याचे काय परिणाम होतील ते येणारा काळच सांगेल.
मुळ विषय आहे तो शिवसेनेचा. तालुका शिवसेनेकडे मुरब्बी, अनुभवी, धुर्त राजकीय व्यक्तीमत्वाची कमी असल्याचे जाणवते. शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हेंना ह्या साऱ्या कारभाराचा भार सोसावा लागणार आहे. पोंभूर्णा शिवसेना निवडणूक जिंकण्याचे निकष लावून उमेदवार देते, की १७ चे उदिष्ठ पूर्ण करायचे म्हणून उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवते यावर बरेच काही अवलंबून आहे. खाता खोलायचे असेल तर निवडणूक जिंकण्याचेच निकष लावणे क्रमप्राप्त ठरेल. शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरेंची एक सभा पोंभूर्ण्यात लावण्याचे प्रशांत कदम बोलून गेलेत, यावरून नगर पंचायत सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक पाठविण्याचा मानस लक्षात येतो, परंतु हा मानस सत्यात उतरवून शिवसेना आपले खाते उघडून नगरसेवक 'व्हाॅईट हाॅऊस' नगर पंचायत मधील सभागृहात पाठवेल काय? या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.
बातमी संकलन:- निलकंठ ठाकरे, पोंभूर्णा