वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई मिळाली अत्यंत कमी.
भद्रावती:- वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई शासनाच्या परिपत्रकानुसार न मिळाल्याने संतप्त झालेले चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा भाजपाचे भद्रावती तालुका अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे यांनी दि.२५ डिसेंबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ताडोबा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोअर) उपसंचालक,चंद्रपूर यांना दि.१६ डिसेंबर रोजी तुळशीराम श्रीरामे यांनी दिलेल्या पत्रानुसार, श्रीरामे यांचा एक बैल दि. १९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील घोसरी परिसरात वाघाने ठार केला. या बैलाची नुकसान भरपाई मिळावी याकरीता श्रीरामे यांनी दि.९ डिसेंबर रोजी दि.११ जुलै २०१८ च्या शासन निर्णयाचा हवाला देत वन अधिका-यांकडे अर्ज केला. या अर्जावर विचार करुन वनाधिका-यांनी केवळ १८ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र या अत्यंत कमी मदतीने श्रीरामे संतप्त झाले.त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या उपरोक्त परिपत्रकानुसार ४० हजार रुपये मदत मिळायला पाहिजे होती. शासनाच्या नियमानुसार बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.परंतू श्रीरामे यांना मिळणारी रक्कम अतिशय तोकडी आहे.या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले असून त्यांच्यासोबत तालुक्यातील मुधोली, काटवल(तु.), विलोडा, आष्टा, वडाळा(तु.), घोसरी, खुटवंडा या गावांतील अन्यायग्रस्त नागरिक उपोषणात सहभागी होणार आहेत.
उपोषणादरम्यान,पशू हानीची किंमत शासन निर्णयानुसार देण्यात यावी, शेतक-यांची पीक हानी प्रकरणे एका महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावित,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अवैधरित्या उत्खनन करुन मुरुमाचे मोठ-मोठे खड्डे तयार करण्यात आले आहे याची चौकशी करण्यात यावी, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) मोहुर्ली यांनी तयार केलेल्या आंबेगळ कुटीच्या रस्त्याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,तहसीलदार, ठाणेदार, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ताडोबा यांना पत्राच्या प्रतिलिपी पाठविण्यात आल्या आहेत.