"शाळा बंद,शिक्षण सुरु" उपक्रमाला भरघोस प्रतिसाद.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना महामारीमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या 'शाळा बंद,शिक्षण सुरू' या उपक्रमाला भद्रावती पंचायत समितीमध्ये ढोरवासा केंद्रात भरघोस प्रतिसाद मिळत असून हे केंद्र तालुक्यात अव्वल ठरले आहे.
सर्वच योजनांमध्ये हिरीरीने भाग घेणा-या या केंद्रात विद्यार्थी,पालक व शिक्षक मेहनत घेत असून केंद्रप्रमुख भारत गायकवाड व गटशिक्षणाधिकारी धनपाल फटींग यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ज्ञानदानाचे धडे सुरूच आहेत. प्रत्येक शाळेने आपल्या स्वयंसेवकाकडून या कार्याला पुढे नेले आहे.महत्वाची बाब म्हणजे गटशिक्षणाधिकारी फटिंग व केन्द्रप्रमुख गायकवाड यांनी प्रत्येक शाळेला वारंवार भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडवून आणला व त्यांना प्रेरणा दिली. शिष्यवृत्ती व नवोदय च्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आधार घेऊन मार्गदर्शन सुरूच आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी फटिंग यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख गायकवाड वारंवार शिक्षकांना झूम मिटिंग व गूगल मिटिंग द्वारे समन्वय साधून या प्रगतीत सातत्य राखून आहेत.यामुळेच ढोरवासा केंद्र 'फिट इंडिया' मध्ये जिल्हा परिषद च्या ११ व माध्यमिक च्या २ शाळांचे राजिस्ट्रेशन वेळेपूर्वी पूर्ण करून तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आहे. सोबतच आठवड्याच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा केंद्राचा ९७ टक्के स्वाध्याय तीन दिवसात पूर्ण करून तालुक्यातून अव्वल ठरला आहे. केंद्रात कर्मवीर विद्यालय गवराळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मुरसा या दोन माध्यमिक शाळा असून आता सुरू झालेल्या आहेत. या दोन्ही शाळांमध्ये सुद्धा कोरोना नियमांचे योग्य पालन करून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. या शाळांना वारंवार भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जात आहे. 'गोष्टीचा शनिवार' मध्येही हे केंद्र तालुक्यातून अव्वल आहे. यामुळेच नुकतेच केंद्रप्रमुख भारत गायकवाड यांचा गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
याबाबत केंद्रप्रमुख गायकवाड यांना विचारले असता हे सर्व केंद्रातील शिक्षकांच्या मेहनतीने, विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने व गटशिक्षणाधिकारी फटिंग साहेब यांच्या योग्य मार्गदर्शनाने शक्य झाल्याचे सांगितले.