जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आत्महत्या करण्याचा विचार करताय? बरं!


लेखक:- अर्चना सानप, 
            बीड 
आत्महत्या म्हणजे केवळ प्राण सोडने किंवा मृत्युला कवटाळणे नाही तर आत्महत्या म्हणजे आपल्या आत्मसन्मानाची हत्या, आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, आपल्याला या भूतलावर मिळालेल्या सर्वश्रेष्ठ जन्माची (मनुष्यजन्म) हत्या होय. मग सहाजिकच आपल्याला सर्वप्रथम जन्म समजून घ्यावा लागेल, आपण नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटात वाढतो आई घेते ते अन्न आपल्यासाठी सुद्धा असते आणि आई घेते तो श्वास सुद्धा आपल्यासाठी असतो म्हणजे या जीवसृष्टीचा भाग होण्यापूर्वी आपण या सर्वव्यापी व्यक्तीच्या शरीराचा भाग असतो आणि आपल्या जन्माला येण्याचा सर्वात मोठा आनंद हा आईला असतो. ती पोटात आपला सांभाळ अतिशय काळजीने करत असते. जेव्हा कोणतीही आई आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा ती मरण यातना सहन करत असते. बाळंतपण हा तिचा पुनर्जन्म असतो आणि जेव्हा ती बाळाला जन्म देते तेव्हा तिला जग जिंकल्याचा आनंद होतो. सर्व त्रास विसरून ती समाधानाने न्हाऊन निघते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतो.
आपला जन्म होतो तेंव्हा आपण एका मातीच्या गोळ्या प्रमाणे असतो आणि आपल्याला या जगाशी एकरूप होण्यासाठी काही वर्ष लागतात तोपर्यंत आपल्याला जगातील प्रत्येक गोष्टीची ओळख आपली आई करून देत असते, म्हणूननच आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते, आपल्याला व्यवहार शिकवणारे वडील हे आपले दुसरे गुरू आहेत तर शिक्षण देणारे शिक्षक आपले तिसरे गुरु असतात आणि या सर्वांनाच आपल्या भारतीय संस्कृतीत ईश्वराचा स्थान आहे. मातृ देवो भव! पितृ देवो भव! आचार्य देवो भव!
          ठीक आहे मग, आपला जन्म होतो आणि आपल्या आयुष्याला सुरुवात होते. या जीवसृष्टीत ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणार आहे हे शाश्वत सत्य आहे. म्हणजेच या जन्म आणि मृत्यू मधलं जे अंतर आहे तो आपला आयुष्याचा प्रवास आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला आयुष्याने काही ना काही तरी संघर्ष वाढून ठेवलेला असतो जो संघर्ष करत आपल्याला आयुष्याचा यशस्वी प्रवास करत पुढे जावे लागते. सुख आणि दुःख हे चक्र कायम आपल्या भोवती फिरत असतं आपण कोणालाही जर प्रश्न विचारला की जगी सर्व सुखी कोण आहे सांगा तर उत्तर एकच मिळेल की जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. कुणाकडे भौतिक सुख आहे तर मानसिक तणाव आणि कुणाकडे भौतिक सुखाचा आभाव आहे तर तो मानसिक समाधानी आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने एका गोष्टीची गाठ कळायला लागल्यापासून मनाशी बांधायला पाहिजे की…………………………. सुखा मागून दुःख येते|| दुःखा मागून सुख || भरल्या ताटावर कोणी उपाशी ||तर कुणी उपाशी पोटी सुद्धा खुश||
          
           मग आयुष्य कडेला लावायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या पुढे येणाऱ्या या सुख आणि दुःखाच्या चक्रा सोबत संतुलन निर्माण करणे आणि चक्राचं फिरणं थांबू न देता आपण स्वतः चालत राहणे आपलं जीवन जगत राहणे. एखाद्या क्षणी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल परंतु तुमच्याजवळ तुमचे आप्तेष्ट नसतील तर मनाच्या कोपऱ्यातील एक भाग तुम्हाला सतत डिवचत असतो आणि तुमची वाटचाल हळूहळू नैराश्याकडे होऊ लागते तसंच तुम्हाला जगाशी स्पर्धा करायची महत्त्वाकांक्षा असते परंतु तुमच्यातील काही उणीवामुळे तुम्ही कुठेतरी कमी पडता आणि तुम्ही स्वतःला नैराश्या कडे ढकलता. या दोन्ही समस्यांचं अगदी साधं सरळ उत्तर आहे परंतु ते आपण स्वीकारत नाही, तुम्ही हवं ते मिळवलंय मग तुम्ही आता तुमचे आप्तेष्ट सुद्धा परत मिळवू शकता त्यांच्यात मिळून-मिसळून जगू शकता त्यासाठी गरज असते ती एकमेकांना भेटणे बोलण्याची. तसंच तुम्ही फक्त तुमच्या उणिवा कडे पहात असाल तर तुम्ही समजून घ्या की सर्वगुणसंपन्न कोणीच नाही उणिवा स्वीकारा चांगले गुण वाढवा जग चांगल्याचे कौतुक करतेच आणि तुमच्या उणिवा दुर्लक्षित केल्या जातात.


          मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो आणि त्यामुळे त्यातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे या भावनेने आयुष्याकडे पाहायला हवे आपण अवतीभवती अनेक प्रकारची माणसं पाहतो त्यातली दिलखुलास व्यक्तिमत्वाची लोकं सगळ्यांचं आकर्षण असतात कारण ते मनमुराद आयुष्य जगत असतात पण म्हणून त्यांना समस्या नाहीत असे होत नाही परंतु कुठेतरी ते त्यांच्या समस्या सोडवण्यास सह आताच्या आपल्या आयुष्याच्या क्षणाला महत्त्व देतात आणि ते त्यांच्या समस्येवरही असेच यशस्वी मात करतात. तर काही असेही लोक असतात की ज्यांचे आयुष्य एकटेपण, दुःख, उपेक्षा, उणिवा, न्यूनगंड, मीपणा, कमीपणा, अशा एक नाही वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले असते आणि या सर्व समस्या मनात दाबून हे लोक वरवर आयुष्य जगत असतात अशा लोकांच्या मनात वारंवार अविचार, नकारात्मक विचार येत असतात आणि ते हळूहळू नैराश्याकडे वाटचाल करू लागतात हे नैराश्य आत्महत्येचं एक प्रमुख कारण आहे.


          ठीक आहे तुम्हाला तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटतंय तर तुम्ही कुठेतरी एकटेच मोठ्यामोठ्याने रडा स्वतःशी बोला अश्रूंना वाट करून द्या हे जमत नसेल तर कुणाशीतरी मनातलं बोला अगदी वारा, पशुपक्षी, प्राणी पाऊस म्हणजेच निसर्गाशी बोला. तुमच्यात काही उणिवा असतील तर त्या स्वीकारा स्वयंपुर्ण कोणीही नसतं. तुम्हाला भीतीने पोखरलं आहे तर लक्षात ठेवा काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा त्या सोडून द्या त्या आपोआप घडू द्या स्वतःला वेळ द्या, काळजी सोडा. वरील समस्या आहेत आणि कुणाची सोबत नको आहे तर स्वतःला पुस्तकात गुंतवून घ्यायला सुरुवात करा गाणे ऐका, फिरायला जा. याव्यतिरिक्त वरील सर्व समस्या वर सर्वात गुणकारी औषध काय आहे तर ते म्हणजे मैत्री, पैसे तुम्ही कमवाल पण ते खर्च होणार आहेत पण जर तुम्ही मित्र कमावली तर ती तुम्हाला नैराश्यापासून कोसो दूर नेतील आणि तुमच्या जीवनाची ट्रेन पटरीवरून कधीच घसरणार नाही.
             जसा मनुष्य जन्म एकदाच मिळतो तसा मृत्यूही एकदा च येणार आहे मृत्यूचे सुद्धा काही प्रकार आहेत नैसर्गिक मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, खून आत्महत्या वगैरे. शारीरिक आजाराने अथवा वृद्धापकाळाने झालेला मृत्यू नैसर्गिक मृत्यू आहे. खरंतर प्रत्येक मृत्यू दुःखद आहे परंतु आत्महत्या हा प्रकार अतिशय वाईट म्हणावा लागेल. मागच्या काळाचा आढावा घेतला तर आपल्याला आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आढळून येत आहे. शेतकरी आत्महत्या, मानसिक तणावामुळे आत्महत्या, सामाजिक मानापमान, व्यवसायिक नुकसान, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद, प्रेमभंग, अपेक्षापूर्ती न होणे, परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे, बेरोजगारी अशा अनेक कारणामुळे अनेक जण आत्महत्या करतात. अलीकडील काही काळामध्ये तर अनेक नवीन कारण सुद्धा पाहायला मिळाले आहेत जसं मोबाईल मधील गेम च्या आहारी जाऊन तरुणांच्या आत्महत्या, मोबाईल टीव्ही बघू न दिल्यामुळे लहान मुलांच्या आत्महत्या, आत्ताच लॉकडाऊन मध्ये आपण पाहिलं कितीतरी मद्यप्रेमींना दारू प्यायला मिळाली नाही म्हणून त्यांनी आपले जीवन संपवले आहे. हे सगळं ऐकताना, पाहताना, या विषयी चर्चा करताना सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्तींना आजच्या पिढीची चिंता वाटल्यावाचून राहणार नाही म्हणूनच आजची पिढी असो की उद्याची येणारी पिढी असो नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे हे समजणं कठीण आहे.
              बरं मग तसं म्हणावं तर आपण पाहतो की अनेक असे व्यक्ती आहेत जे जगाला सद्विचार देतात परंतु स्वतः आत्महत्या करतात तर दुसरीकडे असेही लोक सापडतील की जे आत्महत्या ला शिवून परत आले आहेत आणि पुढील आयुष्य अतिशय यशस्वीपणे जगले आहेत जगत आहेत. म्हणजेच आपली मानसिकता सुदृढ झाली किंवा आपण स्वतःला सावरू शकलो तर आपण नक्कीच आत्महत्याच्या विचाराला हरवायला सक्षम होऊ शकतो.


                  मानसोपचार तज्ञांच्या मते नैराश्य ही मनाची एक भावना आहे ज्याप्रमाणे शरीराला दुखापत होते आणि इजा पोहोचते त्याचप्रमाणे अनेकदा मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे मनाला इजा पोहोचते मन सैर वैर होते मनाला सत्य-असत्य, सुख-दुःख यातला फरक जाणून घ्यावा वाटत नाही. बाहेरच्या जगाचा विचार करावा वाटत नाही, जगण्याचा तिटकारा निर्माण होतो सर्व परिस्थिती विरोधात द्वेष उत्पन्न होतो आणि मनाचा ताबा अविचाराने घेतला जातो परिणामी या सगळ्यांना तोंड देण्याची इच्छा राहत नाही आणि आत्महत्ये ला कवटाळले जाते. वैयक्तिक किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने नैराश्यातून बाहेर पडण्याचे अनेक उपाय आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत गेलं पाहिजे. आता अनेक ठिकाणी मानसिक आरोग्य सुधारावे म्हणून वेगवेगळी शिबिरे देखील घेतली जातात त्याद्वारे मानवी मनाचा सांभाळ करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. फक्त त्यासाठी तुमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला पाहिजे. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवत आहे. एका घरात पाच दिवे जळत होते त्यातला पहिला दिवा म्हणाला मी दिवसभर जळून लोकांना प्रकाश देतोय पण माझी कोणीच कदर करत नाही त्यामुळे मी विझुन जाणच योग्य असं म्हणून तो दिवा विझला पण हा दिवा काही साधासुधा नव्हता तो होता उत्साहाचं प्रतीक. हे पाहून दुसरा दिवा जो शांतीचे प्रतीक होता तो म्हणाला मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असतो तरी लोक हिंसा करतात त्यामुळे मी प्रकाश देणे व्यर्थ आहे म्हणून मला विझायलाच हवं. उत्साहाचा आणि शांतिचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचा दिवा होता तोही आपली हिंमत हरून बसला आणि विझला आता उत्साह शांती आणि हिम्मत न राहिल्यानं चौथ्या समृद्धीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं. आता तिथे एकमेव पाचवा दिवा प्रज्वलित होता खरंतर पाचवा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरी तो सातत्याने जळत होता तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्यांनं पाहिलं तर या घरात किमान एक तरी दिवा जळत आहे असा विचार करुन त्याला आनंद झाला विझलेले चार दिवे पाहून तो निराश झाला नाही कारण त्याच्या मनात आले कमीत कमी एक दिवा तेवत आहे. त्याने तेवत असलेला दिवा उचलला आणि इतर चार दिवे प्रज्वलित केले हा पाचवा अनोखा दिवा कोणता होता तर तो होता आशेचा दिवा. म्हणजेच केवळ एक आशेचा दिवा इतर सर्व दिव्यांना प्रज्वलित करू शकतो तसंच आपलं मन कितीही निराशेच्या गर्तेत असलं तर मनात कुठेतरी एक जगण्यासाठी आशेचा किरण असतो आपण फक्त त्याच्याकडे कानाडोळा करता कामा नये.


        थोडक्यात काय तर आत्महत्या हा जीवन संपवण्याचा सोपा पर्याय असला तरी जीवन जगू न वाटण्याचा शेवटचा पर्याय नक्कीच नाही. आत्महत्या करण्याचा विचार करत असाल तर एकदा वाईट परिस्थितीला तोंड देत जगण्याचा मार्ग स्वीकारून बघा परिस्थिती तुम्हाला स्वीकारेल आणि तुमच्या समस्या टप्प्याटप्प्याने सुटत जातील त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्या.


मग आत्महत्या करण्याचा विचार करताय तर थोडं जगून बघाच!
धन्यवाद!

लेखक:- अर्चना सानप, 
            बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत