महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये शासनाच्या मार्गदर्शक सूचना.

Bhairav Diwase
चैत्यभुमी येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार, घरुनच अभिवादन करण्याचे आवाहन.
Bhairav Diwase. Dec 02, 2020
चंद्रपूर:- कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे न जाता घरूनच अभिवादन करावे अशा मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

     चैत्यभूमी, दादर, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत राज्य शासनाने पुढील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण व उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामुळे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक ०६ डिसेंबर, २०२० रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभुमीवर पुर्ण खबरदारी घेवुन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा. कोविड विषाणुच्या पार्श्वभुमीवर चैत्यभुमी, दादर येथे येण्यावर निर्बंध असल्याने व दादर तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभुमी येथील कार्यक्रमाचे दुरर्दशनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभुमी दादर येथे न येता घरातुनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, त्यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे तसेच घरी राहुनच परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची सर्व अनुयायांना विनंती करण्यात यावी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे व तालुके यामध्ये आयोजित करण्यात येत असल्याने महापरिनिर्वाण दिनी होणाऱ्या गर्दीवर निर्बंध घालण्यात यावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

वरीलप्रमाणे राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.