नागपूर:- पदवीधर मतदारसंघाच्या आज झालेल्या निवडणुकीसाठी कधी नव्हे ते अतिशय चांगले मतदान झाले. ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक उचलली आणि शेवटच्या टोकावरील कार्यकर्त्याने ही निवडणूक अंगावर घेतली. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आणि महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
महापौर जोशी म्हणाले, मतदार यादीतून बरीच नावे गहाळ झाली असली तरी मतदारांची यादी नवीन, फ्रेश असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह होता. नवमतदारांनी सजगतेने मतदान केले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षात नाही झाले, असे विक्रमी मतदान यावेळी झाले.
याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होणार आहे. सकाळपासूनच नागपूर शहरासह ग्रामीण आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळाले. तेव्हाच मतदान विक्रमी होणार, याची खात्री झाली होती. मतदानाचा टक्का वाढला असल्यामुळे विजयाची खात्रीही वाढली आहे.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच आपला विजय होईल. त्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची वाट बघायचीही गरज नाही. आता जास्त प्रतीक्षा नाहीच. उद्या सर्व पिक्चर क्लिअर होणार आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केलेले शिस्तबद्ध कार्य आणि पक्षाचे मजबूत संघटन याचा फायदा पक्षाला नेहमीच मिळाला आहे, तो यावेळी मिळणारच आणि आम्ही भाजपचा असलेला हा गड निश्चितपणे राखू. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांनी संयुक्तपणे ही निवडणूक उचलून घेतली. आमच्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव विदर्भातच काय राज्यभर आहे आणि या नेत्यांनी पूर्व विदर्भ पिंजून काढला. त्यामुळेच विक्रमी मतदान झाल्याचे संदीप जोशी म्हणाले.
भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी सर्व कार्यकर्त्यांनी अगदी शेवटच्या टोकावरील कार्यकर्यांनेसुद्धा ही निवडणूक अंगावर घेतली. शिस्तबद्ध प्रचार आणि बूथचे संचालन केले. त्यांना वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांनी केले मार्गदर्शन याचा लाभ निश्चितच होणार आहे. त्यामुळे उद्या आम्ही विजयोत्सव साजरा करू, याची मला खात्री आहे, असे संदीप जोशी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.