वाघाच्या हल्ल्यात महिला ठार…

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 18, 2020
गडचिरोली:- गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. सुधा अशोक चिलमवार (वय-58, रा. इंदिरानगर) असं मृत महिलेचं नाव आहे. गडचिरोली वनविभागाच्या मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदाडा मार्गावर ही घटना घडली आहे.

           मिळालेली माहिती अशी की, सुधा चिलमवार यांच्यासह 3-4 महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात महिला सरपण गोळा करत असताना त्यांच्यावर वाघानं अचानक हल्ला केला. सुधा चिलमवार या महिलेला वाघानं ठार मारून आपल्या जबड्यात पकडून जंगलात नेलं. आता या महिलेचा वाघानं अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला आहे.

          वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे. या घटनेमुळे गडचिरोली शहरात चांगलीच दहशत पसरली आहे.

       या भागात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. शेती आणि इतर कामांसाठी गावकरी या भागात जातात आणि जंगली जनावरांच्या हल्ल्यात बळी पडतात. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली असली तरी या वाघाचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.