Click Here...👇👇👇

महामार्गावर विनाहेल्मेट फिरणाऱ्या 193 जणांना चाप.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.   Jan 03, 2021
चंद्रपूर:- जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर नव्या वर्षांपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी करून दोन दिवसात १९३ जणांवर कारवाई केली. कारवाईत ९६ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी वाहनचालकांचे समुपदेशनही करण्यात आले.

          सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० टक्के मृत्यूचे प्रमाण दुचाकीने तर १४ टक्के मृत्यूचे प्रमाण चारचाकी वाहनाचे आहे. विशेष म्हणेज मृत्यू पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान करून नसल्याचे समोर आले आहे.

         त्यामुळे जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता नव्या वर्षापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सीटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतला आहे. १ जानेवारीला महामार्गावर विना हेल्मेट फिरणाऱ्या ६९ जणांवर तर २ जानेवारी रोजी १२३ जणांवर कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला.

मोटार वाहन कायद्यान्वये ३०६ कारवाई......
नववर्षाचे स्वागत शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती तसेच शहरात गस्त सुरू होती. जिल्ह्यातील पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री १८ मद्यपी व ३९ दारू विक्रेत्यांविरोधात तर ३०६ जणांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली.

हेल्मेटचा वापर करा......
विनाहेल्मेट प्रवास करणे धोकादायक होत आहे. विनाहेल्मेट अपघात झाल्यास धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकीचालकांनी हेल्मेट घालून तर चारचाकीस्वारांनी सीट बेल्टचा वापर करावा, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी केले आहे.