भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. त्याच्यावर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली.
२००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.
BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीनं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.