अखेर कुडरारा-चिरादेवी पांदन रस्त्याच्या कामास मंजुरी.

Bhairav Diwase

गावकऱ्यांनी मानले पालकमंत्री व आमदारांचे आभार.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कुडरारा-चिरादेवी या पांदन रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था होऊन ग्रामस्थांना आपल्या शेतीच्या कामासाठी शेतात जाणे कठीण होऊन बसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी त्वरीत दखल घेऊन रस्त्याच्या बांधकामास मंजुरी दिल्याने कुडरारावासियांनी त्यांचे आभार मानले आहे.
            सदर पांदन रस्त्याने ऐन हंगामाच्या काळात शेतावर जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने शेतीची कामे कशी करायची असा मोठा गंभीर प्रश्न कुडरारावासियांसमोर निर्माण झाला होता. पावसाळ्यात रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असायचे.त्यामुळे बैलबंडी,शेतीपयोगी अवजारे,धान्य, पिके इत्यादींची वाहतूक करणे कठीण झाले होते.त्यामुळे कुडरारा-गोरजा गट ग्राम पंचायतीचे सरपंच अरुण टेकाम व उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी दि.१६ जून २०२० रोजी राज्याचे पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार व या क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर  यांच्याकडे सदर रस्त्याचे बांधकाम करण्याची  मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी सदर रस्त्याच्या बांधकामास मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले.त्यानुसार दि.९ डिसेंबर २०२० च्या आदेश क्र.खनिज प्रतिष्ठान क्र.साशा/कार्या ११/जि.ख.प्र./२०२०/२६६ नुसार सदर रस्त्याच्या बांधकामाकरीता जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून १५ लाख रुपये तातडीने मंजूर केले आहे. जे काम ६० वर्षात होऊ शकले नाही ते केवळ ६ महिन्यात झाल्याने गावक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबद्दल कुडरारावासियांनी ना.वडेट्टीवार आणि आ.धानोरकर यांचे आभार मानले आहे.