विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असतांना, काय करावे व काय करू नये; जाणून घ्या.

 

पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्यच आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. शिवाय प्राणघातक असली तरी आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती खबरदारी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो.
वीज पडू नये असे आपल्याला म्हणताच येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती प्रक्रिया समजून घेणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून होणारे नुकसान ठरवतात. अज्ञानामुळे आपत्तीविषयी भीती निर्माण होते आणि भीतीमुळे जास्त नुकसान घडते.

⭕ आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी....⭕

1) शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.

2) शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.

3) पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

4) ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.

5) पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.

6) झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.

7) एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.

8) आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.

9) पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.

10) वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.

11) मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.

12) जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.

13) असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी आधी सांगितलेल्या (क्र.१) पद्धतींनी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.

14) चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.

आकाशात विजा चमकत असताना खालील गोष्टी टाळा.⭕

1) खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.

2) विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.

3) वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.

4) गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.

5) झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.

6) दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.

7) एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
8) धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.

9) पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.

10) विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर रहा.

11) प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत