एस टी च्या विभागीय कार्यालयात शासकीय वाहनाचा सर्रास दुरुपयोग - महामंडळाचे आर्थिक नुकसान.

Bhairav Diwase

अधिकारी करतात वाहनाचा अवैध वापर; खाजगी कामांसाठीही वाहनाचा वापर होत असल्याची चर्चा.
चंद्रपूर:- एस टी महामंडळाचे चंद्रपूर विभागीय कार्यालय नेहमीच ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत असुन विभागीय कार्यालयात अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा वारंवार होत असते. ह्याच अनुषंगाने विभागीय कार्यालयातील एक अधिकारी शासकीय वाहनाचा अवैध वापर करत असल्याची जोरदार चर्चा असुन त्या अधिकार्‍यांना वारंवार वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याचीही चर्चा आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर विभागीय कार्यालयात कार्यरत एक अधिकारी आपले खाजगी निवासस्थान ते कार्यालय जाण्या येण्या साठी अवैधपणे शासकीय वाहनाचा गैरवापर करत असुन काही वेळा तर खाजगी कामासाठी सुद्धा सदर वाहनाचा वापर होत असल्याची जोरदार चर्चा आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या पदावर संबंधित अधिकारी कार्यरत आहे त्या पदाला शासकीय वाहनाचा वापर करण्याची नियमानुसार परवानगी नाही असे असुनही इतर कर्मचाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारणार्‍या ह्या अधिकाऱ्याद्वारे बेकायदेशीररित्या शासकीय वाहनाचा दुरुपयोग सुरू असुन स्वतःच्या बाबतीत कायद्याचे पालन करणे सदर अधिकार्‍यांना गरजेचे वाटत नाही हे आश्चर्यच.
वास्तविक पाहता विभागीय नियंत्रक तसेच यांत्रिक अभियंता चलन ह्या पदावरील व्यक्तींनाच शासकीय वाहनाचा वापर करण्याची परवानगी असते मात्र असे असुनही आपल्या वैयक्तिक वापरासाठी अधिकार नसतानाही त्या अधिकार्‍याद्वारे शासकीय वाहनाचा सर्रास वापर होत असुन ह्यामुळे महामंडळाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी दबक्या आवाजात सुरू आहे.