नवजात अर्भक सापडले कचऱ्यामध्ये.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- नवजात अर्भक कचऱ्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आला. नवजात बालिकेस ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, आज गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गावातील काही महिला शौचालयाकरीता बाहेर जात होत्या. यावेळी त्‍यांना गावातील बसस्टॉप पासून माळी मोहल्यामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत कच-यात एका कापडामध्ये गुंडाळलेले अर्भक आढळून आले.
या गोष्‍टीची माहिती गावात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. या बाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येवून नवजात अर्भकाची पहाणी केली. लगेच त्यास ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अर्भक ही बालिका आहे. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाला रात्रीच्या सुमारास कचऱ्यात फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.