कापसाचे ३ लक्ष ९४ हजार ४७० रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त #chandrapur #ballarpurचंद्रपूर:- बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बोगस बीटी कापसाचे अंदाजित रक्कम ३ लक्ष ९४ हजार ४७० रुपयांचे अनधिकृत बियाणे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने जप्त केले.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावात जलसंपदा विभागाच्या पळसगाव आमडी उपसा सिंचन प्रकल्प इमारतीमध्ये बोगस व प्रतिबंधित कापूस बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कृषी व पोलीस पथकासह सदर इमारतीची पाहणी केली असता बोगस अनधिकृत बीटी कापसाचे बियाणे आढळून आले. तालुका कृषी अधिकारी व पोलीस पथकाने सदर ठिकाणाहून ३ लक्ष ९४ हजार ४७० रुपये किमतीचे ४८७ पाकीट बियाणे जप्त केले.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, बल्लारपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण, कृषी सहायक आर.ए.अहिरराव, बी.आर.हराळ, एस.आर.राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत