Top News

पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची सुटका #chandrapur


गडचांदूर पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले प्राण
चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची गडचांदूर पोलीस कर्मचार्‍यांनी सुटका केली आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व 22 ट्रक चालकांची सुटका केली आहे.
चंद्रपुरच्या गडचांदूर मार्गावरील वर्धा नदिच्या पुलावर हे पाणी वाहत होते. या सर्व ट्रक चालकांनी आपले ट्रक पुलाच्या बाजूला उभे केले होते. सर्वांनी पुलावरचे पाणी कमी होण्याची वाट पाहिली परंतु पाणी वाढतच गेले. हे सर्व चालक परराज्यातील होते.
दोन दिवसांपासून हे ट्रक चालक आपल्या ट्रकमध्येच बसून राहिले होते. मात्र काल संध्याकाळी पाणी वेगाने वाढू लागले आणि पुलाच्या आजूबाजूला पाणी तुंबले त्यामुळे सर्व ट्रक पाण्याखाली गेले, तीन किलोमीटरपर्यंत पूल पाण्याखाली गेला आणि 22 ट्रक चालकांच्या मृत्यूचा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. रात्रीची वेळ आणि सगळीकडे पाणी, रात्रीच्या अंधारात पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे सोपे काम नव्हते. पोलिसांच्या ऑपरेशनदरम्यान वरुन पावसाची सतत धार सुरुच होती. तरीही गडचांदूर पोलीस कर्मचार्‍यांनी मोठ्या जिद्दीने बचाव मोहीम राबवून पुरात अडकलेल्या सर्व 22 ट्रक चालकांचे प्राण वाचवले, काल सायंकाळी सुरू झालेले हे बचावकार्य आज पहाटे 4 वाजेपर्यंत चालले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने