राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान होणार चंद्रपुरात #chandrapur

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धनोजे कुणबी समाज मंदिरद्वारा आयोजित कृषी महोत्सवात दिली माहिती

शेतकऱ्यांना जे विकेल तेच पिकविण्याचे केले आवाहनचंद्रपूर:- चंद्रपुरात कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यासाठी स्थायी व कायमस्वरूपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे दहा एकर जागेवर कृषी केंद्र होत आहे. आतापर्यंत हे उद्यान हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होते. आता चंद्रपुरात महाराष्ट्रातील हे एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान होणार आहे. हे कृषी तंत्रज्ञान उद्यान हे राज्यातील आदर्श केंद्र ठरावे व शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा हा उद्देश हे उद्यान उभारणी मागे आहे असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


धनोजे कुणबी समाज मंदिरद्वारा चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी महोत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सुधीर भोंगळे, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर, संजय धोटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, देवानंद वाढई, सुनिता लोढिया, सचिन भोयर, मेळावा प्रमुख श्रीधर मालेकर, धनोजे कुणबी समाजाचे उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सचिव अतुल देऊळकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विधान सभेचे दिवंगत माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभूर्णे यांनाही ना.मुनगंटीवार यांनी आदरांजली वाहिली.


पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले की, काळानुसार शेतीचे सूत्र बदलणे नितांत गरजेचे आहे. आधी पिकवायचे आणि नंतर विकायचे असे आतापर्यंत होत होते. परंतु आता भविष्यात शेतकऱ्यांना समृद्ध व्हायचे असेल, तर त्यांनी जे विकेल तेच पिकविले पाहिजे. ‘कृषी क्षेत्रातील शेतीचे सूत्र बदलणे काळाची गरज आहे. शेती करताना बदलत्या काळानुसार पिकपद्धतीतही बदल झाला पाहिजे. शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिकतेचीही जोड दिली पाहिजे. वित्तमंत्री असताना २०१७ च्या अर्थसंकल्पात जिल्हानिहाय निधीची घोषणा आपण केली. त्यातून जिल्हास्तरीय कृषी उपक्रम हाती घेण्यात आलेत. कृषी प्रदर्शनी केवळ चार दिवसांचा उत्सव बनून राहिला तर त्याना कोणताही अर्थ उरणार नाही. अशा प्रदर्शनी कृषी क्षेत्रातील ज्ञानाचे आदान-प्रदान करणारे मुक्त विद्यापीठ बनावे. अशा प्रदर्शनीतून शेतकऱ्यांच्या जीवनात व्यापक बदल होऊ शकतात.कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोलाची मदत होऊ शकते.

चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाची कृपा असल्याची माहिती विशद करीत ना.मुनगंटीवार म्हणाले की, येथे पर्जन्यमान मुबलक प्रमाणात आहे. चंद्रपुरातील चिचडोह प्रकल्प, पळसगाव-आमडी, कोडगल,भेंडारा, दिंडोरा प्रकल्पांतून व्यापक प्रमाणावर सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

मत्स्य व्यवसायालाही चालना देण्यात येत आहे. ‘जिथे शेत, तिथे मत्स्य तळे’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मत्स्य जाळी पूर्वी डीपीडीसीतून दिली जायची. आता त्यासाठी ८०० नव्हे तर ८ हजार रुपये दिले जातात. बोटींसाठी ३ हजार रुपये मिळायचे आता २५ ते ३० हजार रुपये दिले जातात. यातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळाल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी गौरवाने नमूद केले.

सिंचन सुविधा, कृषिपूरक व्यवसाय व पर्जन्यमानाचा पुरेपूर वापर करीत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ घेता आले पाहिजे, असे नियोजन आता गरजेचे झाले आहे. कृषी विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या युवकांनी शेतीच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. युवकांची अशी फौज शेतकऱ्यांना आधुनिक व पारंपरिक शेतीची सांगड घालत मुबलक शेतीपिकासाठी मार्गदर्शन करू शकतात. १९२७ मध्ये शेती हा नाईलाजाचा व्यवसाय असल्याचे म्हटले जायचे. परंतु आता काळ बदलला आहे. त्यानुसार हे वाक्यही बदलले जावे अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आंतरपिकाच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे ना.मुनगंटीवार म्हणाले. धनोजे कुणबी समाज मंदिराच्या कृषी प्रदर्शनाच्या उपक्रमाचा व अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या कार्याचाही मुनगंटीवार यांनी गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या