Gadchandur News: नगरपरिषद निवडणूक: गडचांदूरमध्ये राडा! मध्यरात्री भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Bhairav Diwase

कोरपना:- नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराने राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील असलेल्या गडचांदूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील निवडणुकीच्या रणधुमाळीला मध्यरात्री हिंसक वळण मिळाले. प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.


गडचांदूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार काल रात्री शिगेला पोहोचला होता. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका भागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर झालेल्या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे गडचांदूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात अशा घटनांमुळे शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. गडचांदूरमधील या घटनेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.