गडचिरोली:- घरासमोरील खुराड्यातून कोंबडा उचलून नेत असलेल्या बिबट्याचा सामना करीत एका इसमाने धैर्य दाखवत त्याचा सामना केला. मात्र, या झटापटीत इसम गंभीर जखमी झाला. ही घटना कुरखेडा तालुक्याच्या आंबेटोला (जांभूळखेडा) येथे बुधवारी रात्री १ वाजता घडली. कलीराम धोंडू हलामी (५५, रा. आंबेटाेला) असे जखमी इसमाचे नाव आहे.
कलीराम हे रात्री घरी झोपले असताना कोंबड्यांच्या काेकावण्याचा आवाज आल्याने ते बाहेर आले. यावेळी बिबट्या तोंडात कोंबडा धरून पळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोंबडा सोडविण्यासाठी त्यांनी बिबट्याचा सामना करताच त्यांच्यात झटापट झाली. काही वेळानंतर बिबट्या काेंबडा घेऊन पळून गेला; मात्र, हलामी यांना बिबट्याच्या पंजाचे गंभीर ओरखडे बसले. त्यांच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमा झाल्याने त्यांना तातडीने कुरखडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड, क्षेत्र सहायक संजय कंकलवार, वनरक्षक सपना वालदे, एस. डब्ल्यू. गोन्नाडे व एम. के. दुधबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या वाहनानेच जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले.


