तालुक्याबाहेरील आणि शेती नसलेल्यांना लाभ; पत्रकार परिषदेत वैभव पिंपळशेंडे यांचा गंभीर आरोप
पोंभुर्णा:- तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या घाटकुळ येथे सन २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पीक नुकसान (पीकहानी) अनुदानाच्या वाटपात भीषण अनियमितता झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शासनाच्या आधार नोंदी, सातबारा उतारे आणि अनुदान वितरण यंत्रणेचा गैरवापर करून बनावट शेतकरी तयार करण्यात आले आणि त्यांच्या नावावर लाखोंचे अनुदान लाटण्यात आले, असा गंभीर आरोप दि. (२७) बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत वैभव पिंपळशेंडे व ग्रामस्थांनी केला आहे.
या घोटाळ्याचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. आरोपानुसार, ज्यांच्याकडे शेती नाही आणि जे तालुक्याबाहेरील आहेत, अशा व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून त्यांना शेतकरी घोषित करण्यात आले. या बनावट शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील वाढीव आराजी (क्षेत्र) दाखवून लाखोंचे अनुदान मिळवून देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, या व्यक्तींचा गावाशी कोणताही संबंध नसतानाही त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आल्याने, पीकहानी निकषांची सरळसरळ पायमल्ली करण्यात आली आहे.
दुसरीकडे, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खऱ्या कास्तकारांना मात्र जाणीवपूर्वक कमी आराजी दाखवून अत्यल्प अनुदानावर समाधान मानावे लागले. अनुदान मिळाल्यानंतर सदर रक्कम संबंधित बनावट लाभार्थ्यांकडून परत घेऊन काही खास मंडळी आणि एजंटांमध्ये वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप पिंपळशेंडे यांनी केला आहे.
चौकशीची मागणी:
वैभव पिंपळशेंडे, नवेगाव मोरे उपसरपंच रेखा मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद थेरे, सामाजिक कार्यकर्ते पपीता कावरे, अंशूल मोरे, बाबुराव मेदाळे आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आम्हाला जशी शंका आली तशी ५-६ दिवसांपूर्वी तपासणी सुरू केली. त्याअनुषंगाने ज्यांना चुकीच्या पद्धतीने पैसे जमा झाले, अशे २०२४ च्या यादीत ८ जण आढळले. २०२५ च्या यादीत एकही आढळलेला नाही. २०२४ च्या यादीत जे ८ जण बोगस आढळले, आपण वसुलीसाठी त्यांना तात्काळ पत्र पाठविले आहे. या प्रकरणात जे संबंधित कर्मचारी होते, त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.मोहनिश शेलवटकर,तहसीलदार, पोंभूर्णा


