चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू #chandrapur(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मांगली येथील दोन शेतकऱ्यांना जागीच ठार करून मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच येथील लुंबिनी नगरातील एका घरी चोरट्याने घरफोडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सध्या भद्रावती शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शहरातील लुंबिनी नगर येथील रहिवासी प्रदीप निखारे यांचा पान मटेरियलचा व्यवसाय आहे. दि.२४ मार्चच्या रात्री २ वाजता एका अज्ञात चोरट्याने निखारे यांच्या घराचा मागचा दरवाजा सबलने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा मजबुत असल्याने त्या दरवाजाची कडी निघू शकली नाही. अखेर निराश होऊन तो चोरटा पळून गेला. परंतु या चोरट्याच्या करामतीची दखल निखारे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने घेतली आणि त्याला कैद केले. दि.२५ मार्चच्या सकाळी सीसीटीव्ही फुटेज बघताच ही बाब निखारे यांच्या लक्षात आली. या घटनेची निखारे यांनी भद्रावती पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, दि.२२ मार्चच्या रात्री मांगली येथील भीषण दुहेरी हत्याकांड करून मंदिरातील दानपेटी चोरून नेली. याचदिवशी आयुध निर्माणी वसाहतीतील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे भद्रावती परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत