राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपुरातील आनंद वाईन शॉप निलंबित

चंद्रपूर:- जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात आले. (91 offenses recorded in State Excise proceedings)

या गुन्ह्यांमध्ये एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चार वाहनांसह एकुण रुपये पाच लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण १३ इसमांवर प्रतीबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे पार पाडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित

अनुज्ञप्ती नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूरच्या सराई वार्ड, जटपुरा गेटजवळील आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित केली असल्याचे आदेश काल (दि.31 मे) निर्गमित केले.