जागेची मालकी नसल्यामुळे गडचांदूरला सुविधा पुरवणे अडचणीचे #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

नगरपरिषद मुख्याधिका-यांचे स्पष्टीकरण

कोरपना:- गडचांदूर नगर परिषद अंतर्गत जागेची मालकी ही माणिकगड सिमेंट कंपनीची असल्यामुळे नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास अडचण येत असल्याचे स्पष्टीकरण गडचांदूर न.प. मुख्याधिका-यांनी दिले आहे.

गडचांदूर नगर परिषद ही सन 2014 मध्ये स्थापन झाली आहे. यापूर्वी तेथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तेव्हापासून गडचांदूरच्या हद्दीत बंगाली कॅम्प येथे नागरिकांचे वास्तव्य आहे. बंगाली कॅम्प नावाने असलेल्या जागेचा मालकी हक्क सातबारा माणिकगड सिमेंट कंपनी यांच्या नावाने आहे. तरीसुध्दा तेथील रहिवास्यांना नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौच्छालयाचा लाभ देण्यात आला आहे.

नागरिकांना देण्यात आलेल्या लाभाच्या विरोधात माणिकगड सिमेंट कंपनीने नगर परिषदेच्या विरोधात दिवानी दावा दाखल केला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.असे असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी गडचांदूर नगर परिषदेने 1 हातपंप, 2 सार्वजनिक नळाची व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी वगळता इतर आवश्यक कामाच्या वापरासाठी देखील पाणी पुरविण्यात येते. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता असते तेंव्हा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु सदर जागेची मालकी माणिकगड सिमेंट कंपनीची असल्यामुळे रस्ता, नाली व पथदिवे अशा पायाभुत सुविधा पुरविण्यास नगर परिषदेला अडचण निर्माण होत असल्याचे न.प.मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)