चंद्रपुर:- जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असुन दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सन २०२३ मध्ये रस्ते अपघातामध्ये हेल्मेट परिधान न केल्यामुळे जास्तीत जास्त दुचाकीस्वार मृत्यमुखी पडलेले आहे. यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांचाही समावेश आहे. बऱ्याच अपघातामध्ये दुचाकी स्लीप होवुन डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झालेला आहे. अपघातामध्ये कुंटूब प्रमुखाचा मुत्यु झाल्यास कर्ता पुरूष हरवल्याने कुंटूब उध्वस्त होवुन जाते.
जिल्हयात दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान न केल्यास तसेच चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट परीधान न केल्यास चंद्रपुर पोलीस दलातर्फे रोजच्या रोज हेल्मेट व सिटबेल्टच्या केसेस करण्यात येतात. आमच्या अशा निर्देशनांस आले आहे की, बरेचसे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दुचाकी चालविताना हेल्मेट परीधान करत नाहीत तसेच चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करत नाहीत. पोलीस खाते हे शिस्तप्रिय खाते असुन कायदा व सुव्यवस्था राखणे व कायद्याची काटेकोरपणेअंमलबजावणी करणे हे पोलीसांचे प्रथम कर्तव्य आहे. पोलीसानीच नियमाचे पालन न केल्याने जनतेमध्ये पोलीसाविषयी चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते.
महात्मा गांधीजी यांनी जगाला महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे, BE THE CHANGE YOU WANT TO SEE (जनतेमध्ये कोणत्याही गोष्टीविषयी सकारात्मक बदल घडवुन आणायचा असल्यास प्रथमतः स्वतःमध्ये तसा बदल घडवुन आणावा) म्हणुनच सर्वप्रथम पोलीस दलाने वाहन चालवितांना हेल्मेट व सिटबेल्ट याचा अवलंब करावा. यामुळे जनमाणसात पोलीस दलाविषयी चांगला संदेश जाईल.
याकरीता मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर आज दिनांक ०७/०२/२०२४ रोजी असा आदेश पारीत करतो की, चंद्रपुर पोलीस दलातील आस्थापनेवरील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कार्यालयात येताना-जाताना व ईतर वेळी सुध्दा दुचाकी चालविताना हेल्मेट तसेच चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच पोलीस ठाणे व शाखेत कामकाजा करीता येणाऱ्या नागरीकाना सुध्दा सदरचा आदेश लागू राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व शाखा प्रभारी अधिकारी कारवाई करतील. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी या आदेशाचे अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवतील.