Click Here...👇👇👇

College student attempts suicide: महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Bhairav Diwase


गडचिरोली:- शिक्षक व व्यवस्थापनाकडून छळ होत असल्याचा आरोप करणारी चित्रफीत आणि चिठ्ठी समाजमाध्यमांवर व्हायरल करीत चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिकेत गजेंद्र सोनटक्के (२२), रा.आरमोरी असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


अनिकेत सोनटक्के हा केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत आहे. ५ जुलैला त्याने स्वहस्ताक्षरातील एक चिठ्ठी आणि स्वत:चा व्हीडिओ व्हायरल केला. त्यात त्याने शिक्षक व व्यवस्थापनावर माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला. महाविद्यालयातील शिक्षक तुषार भांडारकर व पवन दुधबावरे, तसेच व्यवस्थापनाकडून अनेक दिवसांपासून मानसिक त्रास दिला आहे. त्यांना विरोध केल्यास अनुत्तीर्ण करण्यात येईल, महाविद्यालय खासगी असल्याने तुम्हाला एकाच वर्गात बसविले जाईल, अशी धमकीही या शिक्षकांकडून ‍दिली जाते.


या महाविद्यालयात गरीब व शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जातो. क्षुल्लक कारणांसाठी दंड आकारुन त्यांचे शोषण करण्यात येते आणि या रकमेतून संबंधित शिक्षक व कर्मचारी पार्टी करतात, असा आरोप अनिकेत सोनटक्के याने केला आहे. परीक्षेच्या वेळी दोन्ही शिक्षकांनी पुरवणी दिली नाही. त्यामुळे मुख्य उत्तरपत्रिकेवरच पेपर सोडवावा लागला. मॅन्युअलचे गुणही कमी दिले. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे अनिकेतने चिठ्ठीत लिहिले. त्यानंतर त्याने 'हार्पिक' प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.