एक फोटो आणि 10 जणांनी नोकरी गमावली #chandrapur #tadobaandharinationalpark

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढली आहे. अनेक पर्यटक जिप्सीमधून या जंगलात भ्रमण करतात. यावेळी त्यांच्यासोबत टूर गाईड असतात.

परंतु, या अभयारण्यात घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पर्यटकांना अभयारण्यात फिरवणाऱ्या जिप्सींनी एका वाघिणीच्या भ्रमणरस्त्यात अडथळा आणल्यानं, 10 टूर गाईड्सना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सकाळ आणि सायंकाळी सफारीची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ताडोबात त्यांना सफारीसाठी जिप्सी आणि मार्गदर्शकही पुरवण्यात येतात. जिप्सीद्वारेच पर्यटकांना सफारी करणं बंधनकारक आहे. 17 मे रोजी कोअर झोनमध्ये सकाळी खातोडा ते ताडोबा मार्गावर पर्यटकांना घेऊन एका क्रुझरसह दहा वाहनं पर्यटकांना घेऊन सफारी करण्यात आली. वाघीण T-114 ही कोअर झोनमधील सफारी सुरू असलेल्या मार्गाने भ्रमण करत होती. त्यावेळी या जिप्सींनी तिचा मार्ग अडवून अडथळा निर्माण केला. त्यांतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आठवडाभरानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करुन वाघिणीच्या मार्गावर अडथळा निर्माण करण्यात येऊन व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं निष्पन्न झाल्याने जिप्सी, वाहन चालक व मार्गदर्शकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.