मुंबई:- मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. "राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्यांचा फोटो फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. बाबासाहेबांची उंची एव्हरेस्ट पेक्षा मोठी आहे. अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही. उद्या अशी चूक करुन कुणी म्हटलं आम्हाला माफ करा, तर त्यांना माफही करता येणार नाही", असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.
मुनगंटीवार पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, संविधानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही पुढे येतोय, असं शरद पवार साहेबांनी म्हटलं पाहिजे. राजकीय नेते म्हणून ही जबाबदारी आहे. ही घटना दुर्देवी आहे. ही घटना वेदनादायक आहे. संविधानाचा अवमान करणारी आहे. महाराष्ट्राच्या घटनेला कधी माफ करणार नाही. भविष्यात अशी चूक कुणाच्या हातून घडू नये, अशी काळजी सरकारनेही घेतली पाहिजे. मुळात बाबासाहेबांबाबत अशी कृती मान्यच नाही. या प्रकरणात ॲट्रॉसिटी लागतेच. ही चूक म्हणत कातडी वाचवता येणार नाही. महाराष्ट्र अशा घटनेला कधी माफ करणार नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.